साहित्य क्लब
पोलीस दलामध्ये काम करताना मनाला विरंगुळा म्हणून काहीतरी छंद असणे आवश्यक आहे. अशाच प्रकारे वाचनाची आवड असलेल्या प्रशिक्षणार्थींचा साहित्य क्लब पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे सुरू करण्यात आला आहे. या क्लबमध्ये सहभागी असलेल्या प्रशिक्षणार्थींना विविध प्रकारच्या आणि विषयांच्या पुस्तकांचे वाचन करण्याचा छंद जोपासता यावा आणि अशा पुस्तकांतील मर्म समजून घेता यावे, या उद्देशाने प्रशिक्षणार्थींनी एक पुस्तक वाचून त्या पुस्तकाचा बुक रिव्ह्यू देण्याची प्रथा क्लबमध्ये सुरू करण्यात आली आहे. या क्लबमधील प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण केंद्राच्या वाचनालयातून साहित्य, ऐतिहासिक कादंबऱ्या, कायदेविषयक पुस्तके, आत्मचरित्रे, कथा यासारखी पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येतात. प्रशिक्षणार्थींचा शब्दसंग्रह वाढावा, त्यातून त्यांना वाचन व लेखनाची आवड निर्माण व्हावी व त्यांचे वकृत्व सुधारावे या उद्देशाने हा क्लब चालवला जातो. तसेच प्रशिक्षणार्थींसाठी वादविवाद स्पर्धांचे आयोजन केले जाते.