पोलीस अधिकाऱ्यांसाठी प्रादेशिक प्रशिक्षण शाळा
स्वातंत्र्या नंतरचे पहिले दशक प्रशासनामध्ये परिवर्तन करण्यामध्ये गेले. भाषावार प्रांतरचनेप्रमाणे आपल्या मुंबई प्रांताचे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. कल्याणकारी राज्यांची संकल्पना उदयास आल्याने पारंपारिक पोलीस कार्यपद्धतीमध्ये देखील काही परिवर्तन करण्यात आले. देशातील प्रत्येक राज्य सरकारने आपल्या राज्यातील पोलीस अंमलदारांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण शाळा सुरू केल्या. याच काळामध्ये म्हणजेच १९५७ मध्ये मुंबई राज्य सरकारने देखील पोलीसांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रादेशिक स्तरावर प्रादेशिक पोलीस प्रशिक्षण शाळा (रिजनल पोलीस ट्रेनिंग स्कूल आर. पी. टी. एस) सुरू करण्याचा निर्णय घेतला व दि. ३/११/१९५९ रोजी मुंबई राज्य सरकारने छत्रपती संभाजी नगर रेंज साठी जालना व मुंबई, पुणे रेंज साठी पुणे येथे प्रादेशिक पोलीस प्रशिक्षण शाळा सुरु करण्याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध केला व त्या नुसार एस.आर.पी.एफ. ग्रुप १ चे कमांडट हे प्राचार्य पदी नेमण्यात आले. जालना येथे एस आर.पी.एफ. ग्रुप ६ चे कमांडट हे जालना येथे प्राचार्य पदी नेमण्यात आले. पुणे येथे दि. १/२/१९६० रोजी व जालना येथे दि. १५/३/१९६० रोजी प्रत्यक्ष प्रशिक्षण सुरु झाल्याबाबत दि . २४/१,/ १९६२ च्या शासन निर्णयात उल्लेख आहे. विदर्भ प्रांतातील नागपूर हा भाग स्वातंत्र्यापूर्वी मध्य प्रांताच्या राजधानीचे ठिकाण असल्यामुळे इसवी सन १८६७ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा पोलीस शाळेची १९३४ मध्ये प्रादेशिक पोलीस प्रशिक्षण शाळेमध्ये परावर्तित करण्यात आली. मुंबई शहर पोलीस यंत्रणा त्यांच्या निर्मितीपासूनच १७ फेब्रुवारी १७७९ बॉम्बे प्रेसिडेन्सी आणि स्टेट नुसार पूर्णपणे अलग होती. नायगाव पोलीस मुख्यालयांमध्ये १९२३ पासूनच सुरू करण्यात आलेल्या पोलीस शाळेचे रूपांतर प्रशिक्षण संस्थेमध्ये करण्यात आले. सन १९७६ मध्ये ही प्रशिक्षण शाळा मरोळ येथील प्रशस्त जागेवर हलवण्यात आली.