पश्चिम महाराष्ट्रासाठी प्रशिक्षण शाळेसाठी जागेचा शोध व त्याचा पूर्व इतिहास
आता राहता राहिला प्रश्न तो पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक शाळेचा. या शाळा मुख्य शहरापासून दूर प्रशस्त ठिकाणी आणि पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण प्रांताच्या सीमावरती भागात म्हणजेच मध्यवर्ती ठिकाणी असाव्यात असे शासकीय निर्णयांमध्ये नमूद होते त्यामुळे अशा जागेची चाचणी सुरू असतानाच एक मजेशीर योगायोग जुळून आला की ज्यामुळे या प्रादेशिक पोलीस प्रशिक्षण शाळेच्या जागेची समस्या सुटण्यास मोठी मदत झाली. अठराव्या शतकाच्या प्रारंभी हिंदुस्थानाचा मोठा भूप्रदेश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आला पुणे,मुंबई या दोन शहरांचे तोपर्यंत सख्य कमीच होते परंतु इसवी सन १८५३ मध्ये मुंबई ते ठाणे सुरू झालेल्या रेल्वेने १८६४ मध्ये खंडाळ्याचा घाट ओलांडून पुण्यात प्रवेश केल्यानंतर मात्र ही दोन्ही ठिकाणी परस्परांच्या मदतीने झपाट्याने विकसित होत गेली. मराठ्यांच्या राजवटीत पुण्याच्या मावळ दिशेकडील तो मावळ प्रांत हा घाट आणि कोकण प्रांताना जोडणारा एक ATRIA प्रदेश म्हणून ओळखला जातो. रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबई पुण्याकडील युरोपियन लोकांनी लोणावळा आणि खंडाळा या नैसर्गिक रूपाने बहरलेल्या थंड हवेच्या ठिकाणांची निवड करून या भागात बंगले बांधून राहणे पसंत केले. या भागात प्रार्थनेसाठी मोठमोठे चर्च देखील बांधले गेले. त्यांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी येथे मध्यवर्ती ठिकाणी निवासी शाळा सुरू करण्यात आली. बघता बघता मुंबई पुणे रस्त्याच्या दोन्ही बाजूस युरोपियन लोकांची टुमदार घरे तर काही ठिकाणी प्रशस्त बंगले दिमाखाने विस्तार होऊ लागले. आपल्या देशावर युरोपियन सत्ता असेपर्यंत लोणावळा खंडाळा परिसर त्यांच्या वास्तव्याने व्यापून टाकला होता. इसवी सन १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र देऊन युरोपियन अधिकारी मायदेशी निघून गेले. लोणावळा खंडाळा परिसरामधील कित्येक मोठे प्रशस्त बंगले, शाळा, निवासस्थान आणि चर्च ओस पडले. सेंट पीटर्स गर्ल्स स्कूल सॅनिटोरियम ही अशाच एका जागे पैकी, खंडाळा आणि लोणावळा गावांच्या मध्यवर्ती ठिकाणी १८९० पासून वसलेल्या सेंट पीटर गर्ल्स स्कूल सेनोटोरियम चा समावेश होता. मुंबई पुणे महामार्गावरील खंडाळा गावातील एका अवघड वळणावर उंच टेकडी आहे या भागातून बारमाही पाणी वाहणारा नाला, नाल्याच्या काठावरील हिरवेगार निसर्गरम्य टेकडीवर ख्रिश्चन मिशनरी यांची नजर पडली व सेंट पीटर्स गर्ल्स स्कूल सेनोटोरियम ही मुलींची निवासी शाळा सुमारे १८९० च्या आसपास सुरू करण्यात आली. या ठिकाणी एक मोठे चर्च बांधण्यात आले, फादरसाठी दहा खोल्यांचा एक प्रशस्त बंगला, धर्मप्रचारकांसाठी वेगवेगळे बंगले, मुलींच्या निवासासाठी प्रशस्त एक माळ्याचा भव्य बंगला, वर्गांसाठी इमारती, नोकरदार वर्गांसाठी छोट्या छोट्या बॅरेक मुलींच्या जेवणासाठी भोजनगृह इत्यादी प्रशस्त इमारती बांधण्यात आल्या शाळेसाठी शिक्षक वर्ग, सेवक वर्ग, धोबी, माळी, स्वयंपाकी, स्वच्छता कामगार इत्यादी अनेक कर्मचाऱ्यांची निवासस्थाने बांधण्यात आली. स्वातंत्र्यानंतर बहुसंख्य युरोपियन मायदेशी निघून गेल्याने त्यांच्या मुलींअभावी तुंगालीं टेकडीवरील शैक्षणिक निवासी शाळेची संख्या रोडावत जाऊन अखेर ती बंद पडली. या मोठ्या रिकाम्या प्रशस्त जागेचा गैरवापर गुन्हेगारी लोक करत असत. याचवेळी या मोठ्या रिकाम्या बंगल्यांचे करायचे काय हा प्रश्न एका बाजूने आवासुन उभा असतानाच दुसऱ्या बाजूने पोलीसांच्या प्रादेशिक प्रशिक्षण शाळेसाठी सुद्धा जागेचा प्रश्न उभा राहिला होता. पुणे येथे सुरु करण्यात आलेल्या प्रादेशिक पोलीस प्रशिक्षण शाळेस जागा कमी पडत असल्याने सेंट पिटर गर्ल्स स्कूल ची जागा पोलीस प्रशिक्षण शाळेसाठी वापरता येईल काय याची पडताळणी सुरू झाली. मोठ्या शहरांपासून दूर, प्रशस्त जागा, मध्यवती ठिकाण, सर्व सुविधा, सडक आणि रेल्वे मार्गाने जोडलेले, मुबलक पाणी आणि जमीन इत्यादी शासनाच्या कसोटीला सेंट पीटर गर्ल्स स्कूल सॅनिटोरियमचा परिसर उतरला आणि या प्रशस्त वास्तूमध्ये प्रादेशिक पोलीस प्रशिक्षण शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने सन १९६० मध्ये घेतला. या टेकडीवरील सेंट पीटर गर्ल्स स्कूल यांच्या एकेकाळी सर्व सुविधांनी उपयुक्त असणाऱ्या या वास्तू दहा ते बारा वर्ष बंद स्थितीमध्येच असल्याने मोठ्या प्रमाणात पडझड झालेली होती. इमारतींच्या दारे खिडक्या मोडकळीस आल्या होत्या. कोणाचेही वास्तव्य नसल्यामुळे आधीच जंगल असलेल्या या भागात स्थानिक गुराख्यांनी गोठे तयार केले होते . रस्त्यावर खड्डे पडलेले होते या वास्तूची मोठ्या प्रमाणावर डागडुजी करणे पायवाटा तयार करणे आणि एक पोलीस प्रशिक्षण संस्था म्हणून सुरू करण्यासाठी अनेक प्राथमिक मूलभूत सुविधांची निर्मिती करण्याची आवश्यकता होती. या परिसराचे रूपांतर पोलीस प्रशिक्षण संस्थेमध्ये करण्यासाठी मुंबई राज्य सरकारने सन १९५९ च्या अखेरीस पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या एका अधिकाऱ्याची प्राचार्य पदावर नेमणूक करण्याचा निर्णय घेतला या कामगिरीवर श्री.ए. बिडले या शिक्षणप्रेमी आणि कष्टाळू पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक केली . संस्थेचे पायोनियर ठरलेल्या बिडले सरांनी १ जानेवारी १९६० रोजी या पदाचा पदभार सांभाळला आणि प्रादेशिक पोलीस प्रशिक्षण शाळा खंडाळा या संस्थेच्या कामकाजाला सुरुवात झाली . दरम्यानच्या काळात एक मे १९६० रोजी राज्याची निर्मिती झाल्याने या संस्थेच्या कामकाजाला अधिकच वेग आला. प्रादेशिक पोलीस प्रशिक्षण शाळेचे कामकाज सुरू करणे म्हणजे एक मोठे आव्हानच त्यांच्यासमोर होते. प्रशिक्षणार्थीची निवास आणि भोजन व्यवस्था, स्नानगृहे, स्वच्छतागृहे, वर्गांच्या खोल्या, कार्यालय, अधिकारी अंमलदार आणि कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परेड ग्राउंड असे एक ना अनेक यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभे होते. परंतु बिडले साहेबांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने हा शिव धनुष्य उचलण्याचा विडा उचलला.साहेबांनी प्रशिक्षण संस्थेचा एक मास्टर प्लॅन तयार करून त्याप्रमाणे अगदी नियोजनपूर्वक कामाला सुरुवात केली. बिडले साहेबांची बदली इतरत्र झाल्याने १४ जानेवारी १९६१ रोजी त्यांच्या जागी प्राचार्य पदी ओ. आर. लबडे यांची नेमणूक करण्यात आली. त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून पुणे येथील नव्यानेच कार्यरत झालेल्या राज्य राखीव पोलीस दलातील जवानांची मदत घेतली. या दलाच्या तीन ते चार तुकड्यांनी अहोरात्र खपून इमारतीची डागडुजी आणि परेड ग्राउंड तयार करण्याच्या कामाला वेग आला. दुरुस्तीचे काम आता कुठे प्रगतीपथावर येते, तोच सन १९६१ मध्ये गोवा मुक्तीच्या मोहिमेवर या जवानांना पाठवण्यात आल्याने कामांमध्ये खंड पडला. प्राचार्य लबडे सरांनी आपल्या अपुऱ्या सहकाऱ्यांच्या मदतीने हे अपूर्ण राहिलेले कार्य पुढे चालू ठेवले. गोवा मुक्ती मोहिमेवरून परतल्यानंतर एस. आर. पी. एफ. च्या जवानांनी या ठिकाणचे उर्वरित कार्य पुढे सुरू केले. इमारतींची आणि प्राथमिक सुविधांची पूर्तता झाल्यानंतर या ठिकाणी प्रादेशिक पोलीस प्रशिक्षण सुरु करण्यात आले. मात्र पहिल्या तुकडी चे स्वागत करण्याची संधी लबडे साहेबांना मिळाली नाही २८ फेब्रुवारी १९६२ रोजी त्यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी प्राचार्य म्हणून एन. एन. कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली.