खंडाळा प्रशिक्षण जागेची भौगोलिक रचना
ज्या कोणी या संस्थेला भेट दिली असेल त्यांना माहीत होईल की या छोटेखानी प्रशिक्षण संस्थेचा परिसर तीन भौगोलिक तुकड्यांमध्ये विभागलेला आहे. एक मूळ भूभाग यामध्ये सेंट पीटर गर्ल्स स्कूल सॅनिटोरियमच्या ताब्यात असणारा भूभाग होय .पूर्वीच्या गर्ल्स स्कूल संस्था प्रमुख असलेले फादर यांचा आठ खोल्यांचा प्रशस्त बंगला संस्थेचा केंद्रबिंदू होता . सन १९८१ पर्यंत या राजेशाही बंगल्यात या संस्थेच्या प्राचार्यांचे निवासस्थान होते. त्यानंतर ते आज पर्यंत व्हॉइस प्रिन्सिपल्स बंगला या नावाने ओळखले जाते. या प्रशस्त बंगल्याला लागूनच एका चर्चची भलीमोठी इमारत आहे.१०० वर्षांपूर्वीची ही काळ्या दगडाची वास्तु आजही गतकाळाच्या स्मृतींना उजाळा देत खंबीरपणे पाय रोवून उभी आहे . या चर्च चे कोरीव बांधकाम आजच्या पिढीला थक्क करून सोडते. या ऐतिहासिक वास्तूला लागून शाळेची मुख्य एक मजली इमारत आजच्या काळातील पाच मजले भासावी अशी जोडलेली आहे. २६ एकर भू क्षेत्राचा वृक्षवेली, लतांनी बहरलेला हा सारा परिसर मूळ सेंट पीटर्स स्कूल यांचा आहे . याच मुख्य इमारती समोर आता प्राचार्यांचे कार्यालय, प्रशिक्षणार्थी निवासस्थान आणि मोटार वाहन विभाग आहेत.