स्वयंस्फुर्ती | २०२४-२०२५
प्रभारी उपप्राचार्यांचे मनोगत
श्री. श्रीहरी पाटील
उपप्राचार्य प्रशासन, पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा
चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला अनंत आमुची ध्येयाशक्ती अनंत अन आशा, किनारा तुला पामराला.
कोलंबसचे गर्वगीत हे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवीवर्य कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकरांनी लिहिलेल्या कवितेतील ओळी सांगतात की प्रबळ इच्छाशक्ती असणारी व्यक्ती कोणतेही शिखर सर करू शकते व कोणतेही काम हसत हसत पूर्ण करता येते. आपण सर्वांनी पोलीस दलातील आपल्या कार्यकाळात समाजाची सेवा करण्याचा पवित्र निर्णय घेतला आहे ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी आपण सर्वांनी पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा येथे कठोर प्रशिक्षण घेतले आहे.
स्त्री म्हणून तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जसा असतो तो या प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये बदल घडवून रणरागिनी घडवण्याचं ध्येय प्रशिक्षण कालावधीत साध्य करावे लागते. हेच आदम्य साहस, बळ, इच्छाशक्ती, कष्ट करण्याची क्षमता नवीन आव्हानांना सामोरे जाऊन त्यांना पायचीत करण्याची ताकद प्रशिक्षणातून दिली जाते.
हेच बळ आम्हाला सह्याद्रीने दिले, या मातीने दिले. आपली वैभवशाली परंपरा जपणारा सह्याद्री पर्वत... या पर्वताचे वैभव जपणारी, टेकड्यावरती वसलेली लोणावळा, खंडाळा, तुंगार्ली ही वैभवशाली, समृध्द अशी गावं. ज्ञानाची सरिता जिथे उगम पावली, खऱ्या अर्थाने उपजली जिथे इंद्रायणीचा उगम झाला ते लोणावळा हे गाव. ज्या सौंदर्यान परकीयांनाही भुरळ पाडली, अशा सह्याद्रीच्या निसर्गरम्य ८ टेकड्यावरती वसलेले पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा.
फुलांप्रमाणे नाजूक व कोमल असलेल्या, पोलीस दलात नव्याने भरती झालेल्या महिलांना, सह्याद्री प्रमाणे प्रकट, कणखर बनवण्याचे प्रशिक्षण पोलीस प्रशिक्षण केंद्रात दिले जाते.
विस्तार-आज रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा हे ४६.७७ एकर क्षेत्रावर वसलेले आहे. लोणावळा, खंडाळा, तुंगार्ली या तीन गावांच्या सीमेवर आठ निसर्गरम्य टेकड्यांवरती नैसर्गिक समृद्धतेने नटलेला हा परिसर पोलीस प्रशिक्षण केंद्राचा परिसर हा मुळातच अत्यंत निसर्गरम्य आहे. त्यातच नैसर्गिक ओढे, नाले, झरे, धबधबे, पाण्याचे डोह, अनेक दुर्मिळ वनस्पती, वृक्षवेली, नानाविध पक्षी, वन्यजीव यांनी समृद्ध झालेला असा परिसर, प्रशिक्षण मैदानाच्या मध्यवर्ती असलेला सनसेट पॉईंट, बटरफ्लावर व्हॅली, सूर्यप्रकाश गपॉईंट, बाथटब पॉइंट, विल्यम पॉइंट, खंडाळा व्हयू पॉईंट, वॉटर फॉल पॉईंट अशा अनेक समृद्धतेने नटलेल्या प्रशिक्षण केंद्राचे हे ज्ञानदायी प्रांगण. पाच महिन्यापेक्षा जास्त काळ धो-धो पाऊस, वर्षभर थंडी, वर्षभर नाजुक कोवळे उन्ह हे इथल्या नैसर्गिक संपन्नतेची लक्षणे. अशाच समृध्द प्रशिक्षण प्रांगणाचे सौंदर्य महिला प्रशिक्षणार्थीनी उजळून टाकले आहे. आवर्जून भेट द्यावी अशा अनेक गोष्टी या प्रशिक्षण केंद्राच्या प्रांगणात आहेत.
आपल्या पुढील वाटचालीस माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!
श्री. श्रीहरी पाटील
उपप्राचार्य, प्रशासन