नवप्रविष्ठ पोलीस शिपाई सत्र क्र. ३६ मधील २९३ प्रशिक्षणार्थी यांनी मुलभूत प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करुन दिनांक ०९ जून २०२५ रोजी त्यांचे दिक्षांत संचलन आयोजित केलेले आहे. या निमित्ताने सर्व प्रशिक्षणार्थीचे मी मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करीत आहे.
सन २०१३ पासुन पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा येथे प्रत्येक सत्रातील प्रशिक्षणार्थीकडून स्मरणिका तयार केली जाते. या स्मरणिकेमध्ये प्रशिक्षणार्थी स्वतःचे अनुभव आणि त्यांच्या अंगी असलेले विविध कला गुण या स्मरणिकेद्वारे प्रदर्शित करीत असतात. या स्मरणिकेमध्ये प्रकाशित होत असलेले सर्व साहीत्य, लेख प्रशंसनीय आहेत. त्यामुळे मी या सर्व प्रशिक्षणार्थीचे कौतुक करतो.
सदरील मुलभूत प्रशिक्षण आपण सर्वांनी अतिशय मेहनतीने पूर्ण केले आहे. प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत आपल्या व्यक्तिमत्वामध्ये प्राचार्य आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अमूलाग्र बदल घडवून आणला आहे. सदरचा बदल हा केवळ शारिरीक व मानसिक नसुन त्यातून आपले कर्तव्यतत्पर व्यक्तिमत्व घडले आहे. प्रशिक्षण कालावधीतील प्राप्त ज्ञानाचा समाजामध्ये कर्तव्य बजावताना आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे. या ठिकाणी आपण जी मुल्य प्राप्त केली आहेत. त्याचा विसर पडु न देता आयुष्यभर ती जोपासण्यासाठी प्रयत्न करा. तुमच्या अंगी असलेली विद्वता, नम्रता आणि तुमच्यावर झालेले संस्कार याचा फायदा समाजाला होऊ द्या. तुमची शिस्त, कर्तव्यनिष्ठा, प्रशिक्षण केंद्रात मिळविलेले ज्ञान व तुमची सचोटी (प्रामाणिकपणा) आयुष्यभर जोपासले तर पोलीस विभागात काम करणे सर्वांसाठी सुखकर होईल.
आता तुम्ही पोलीस सेवेत आला असुन वैयक्तिक हितापेक्षा राष्ट्रीय आणि सामाजिक हितास प्राधान्य द्या. नियमित वाचन करा, तंत्रज्ञानात होणारे नवनवीन बदल शिकुन घ्या व त्याचा आपल्या दैनंदिन कामकाजात कसा चांगल्या पध्दतीने उपयोग होईल हे पहा....
आपल्याला पुढील वाटचालीस माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा !