अलौकीक, गौरवशाली व दैदिप्यमान परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाचा एक भाग होण्यासाठी आपण पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा येथुन खडतर असे मुलभूत पोलीस प्रशिक्षण घेवून देशसेवेसाठी सज्ज होत आहात त्याकरिता मी आपक मनःपूर्वक अभिनंदन करते
`सद्रक्षणाय खलनिग्रहणाय`
या ब्रिदवाक्याचे कायम स्मरण ठेवून आपणास आपले कर्तव्य पार पाडायचे आहे. हे कर्तव्य करीत असताना गुन्ह्यांचा तपास करणे, गुन्हेगारांचा शोध घेणे, कायदा सुव्यवस्था सांभाळणे, व्ही. आय. पी बंदोबस्त करणे, वाहतुकीला शिस्त लावणे इत्यादी जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या पोलीस दलामध्ये आपण पोलीस म्हणून कर्तव्य पार पाडणार आहात.
आपणांस या पोलीस वर्दीने प्रदान केलेल्या शक्तीचा अत्यंत काळजीपुर्वक वापर करायचा आहे. आपल्याकडे आलेला प्रत्येक नागरिक हा कोणत्यातरी अन्यायाने ग्रस्त झालेला असतो तेव्हा त्याचेशी असलेली आपली वागणूक अत्यंत सहानुभुतीची व मदतीची असली पाहीजे. त्याला मानसिक आणि कायदेशीर मदत देणे हे आपले कर्तव्य आहे, याचा विसर कधीही पडू देऊ नका. आपल्याकडे मदतीच्या अपेक्षेने आलेल्या प्रत्येक नागरिकामध्ये जर आपले, आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा किंवा मुलगी यापैकी कोणीतरी असते तर आपण ज्या स्तरावर जाऊन त्यांना मानसिक आधार व कायदेशीर मदत केली असती, त्याच स्तरावर जाऊन त्या नागरीकांस आपण मदत केली तर या आपण परिधान केलेल्या वर्दीची शान आपण समाजात उंचावू शकू.
पोलीस दलामध्ये सेवा करत असताना राष्ट्राची एकता व अखंडता कायम ठेवण्यासाठी प्रसंगी प्राणाचे बलीदान करण्याची आपली सदैव तयारी असली पाहीजे. यापुढे आपला धर्म व जात ही फक्त `खाकी` च असून `सत्यमेव जयते` हिच याची शिकवण आहे. आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडताना आपण प्रसंगी वज्रकठोर होऊन आपले कर्तव्यपालन कराल अशी अपेक्षा व्यक्त करते.
महाराष्ट्र पोलीस दलाच्या गौरवशाली परंपरेला स्मरून आपण सामान्य नागरिकांस केंद्रस्थानी ठेऊन आपले कर्तव्य कराला असा विश्वास व्यक्त करून आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देते.
`जय हिंद`